वेदांतू होणार का युनिकॉर्न?मोठी गुंतवणूक मिळविण्याच्या तयारीत
New funding if received will make Vedantu 5th Unicorn from Edu-Tech
गेल्या काही दिवसांपासून बायजूज बंगलोर येथील वेदांतूला टेकओव्हर करण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांतू सध्या १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक मिळविण्याच्या तयारीत आहे. ही गुंतवणूक मिळाल्यानंतर वेदांतूचे एकूण व्हॅल्युएशन १ बिलियन डॉलर होणार असून कंपनी युनिकॉर्न ठरणार आहे. या फंडिंग राउंडमध्ये वेदांतूमधील विद्यमान गुंतवणूकदारांद्वारे सुमारे ६० मिलियन डॉलर्स गुंतवले जातील. यामध्ये कोट्यू मॅनेजमेंट, जीजीव्ही कॅपिटल आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. आणखी एक एशियन प्रायव्हेट इक्विटी फंड वेदांतूमध्ये ४० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
आता अशी माहिती समोर आली आहे की वेदांतू आणि बायजूज यांच्यात कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नव्हते. त्यामुळे बायजूज वेदांतूला टेकओव्हर करण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वेदांतूचे सीईओ वमशी कृष्णा यांनीही मुलाखतीमध्ये टेकओव्हरचे वृत्त फेटाळून लावले. आपली कंपनी स्वतंत्रपणे वाढवणे ह्याला सध्या आम्ही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बायजूज, अनअकॅडमी, अपग्रॅड आणि एरुडिटियसनंतर वेदांतू ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात भारतातील पाचवी युनिकॉर्न बनेल. ह्या सर्व एक बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त व्हॅल्युएशन असणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. कृष्णा, पुलकित जैन, आनंद प्रकाश आणि सौरभ सक्सेना यांनी २०११ मध्ये वेदांतूची सुरुवात केली. वेदांतू सध्या K12 विद्यार्थ्यांसाठी थेट कोचिंग क्लासेस पुरवते, ज्यात IIT JEE Main आणि Advanced Engineering आणि NEET या कोर्स चा समावेश आहे. कंपनी सीबीएसई आणि आयसीएसई, तसेच विविध राज्य शिक्षण मंडळांसाठी, नमुना प्रश्नपत्रिका, नोट्स, मॉक टेस्ट देखील पुरवते. वेदांतूने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात त्यांच्या वेबसाइटवर २७ मिलियन व्हिजिटर्स आणि यूट्यूबवर ६८ मिलियन मासिक व्ह्यूज होते.
यापैकी बरेच ग्राहक वेदांतूची उत्पादने विनामूल्य वापरतात. मात्र हळूहळू कंपनीची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे. सध्या कंपनीकडे २ लाख पेड ग्राहक आहेत, जे गेल्या एका वर्षात चार पटीने वाढले आहेत. मे २०२१ अखेरीस कंपनीचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत चार पटीने वाढला आहे. फक्त मे २०२१ या एका महिन्यात कंपनीचा महसूल ३५ कोटी रुपये होता तर वार्षिक महसूल जवळपास ४२० कोटी रुपये एवढा होता. संदर्भ द्यायचा झाल्यास आकाश जे भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या ऑफलाईन कोचिंग सेंटरपैकी एक होते, त्यांचा २०२० आर्थिक वर्षात मासिक महसूल १०० कोटी रुपये होता.
जुलै २०२० मध्ये कोट्यू मॅनेजमेंटव्दारे वेदांतु ने १०० मिलियन डॉलरचा निधी उभा केला होता. त्यावेळी कंपनीचे व्हॅल्युएशन ६०० मिलियन डॉलर्स होते. त्यानंतर मात्र वेदांतूसाठी आणखी निधी उभारणे अवघड ठरले आहे. त्या तुलनेत बायजूज आणि अनअकॅडमी या दोन्ही कंपन्यांचे व्हॅल्यूएशन गेल्या १८ महिन्यांत गगनाला भिडले आहे. अनअकॅडमी व्हॅल्युएशन फेब्रुवारी २०२० मधील ५०० मिलियन डॉलर्सपासून ते आता ३.४ बिलियन डॉलर्सवर गेले आहे. तर बायजूज व्हॅल्युएशन त्याच कालावधीत ५ बिलियन डॉलर पासून १६.५ बिलियन डॉलर पर्यंत गेले आहे.
Comments are closed.