गेल्या काही महिन्यांत भारतात क्रिप्टो करंसचे फॅड बरेच वाढले आहे. अनेक रिटेल इव्हेस्टर्स याकडे आकर्षित होऊन छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहेत. यातून मिळणाऱ्या मोठ्या रिटर्न्सच्या आकड्यांनि सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटत आहे. आपणही असेच छप्परफाड रिटर्न मिळवू शकू असे या रिटेल इंव्हेटर्सला वाटते. मात्र ही इन्व्हेस्टमेंट करताना सावधान. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत बँकांना एक सूचना जारी केली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेच्या सूचनेत ज्या बँका क्रिप्टो करंसी एक्स्चेंजसोबत व्यवहार करतात त्यांना हे थांबविण्यास सांगण्यात आले आहे. बँका क्रिप्टो करंसीमध्ये एक्स्चेंजसोबत व्यवहार करू शकतात असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असूनही रिझर्व्ह बँकेने ही सूचना दिली आहे. लवकरच याबाबत सरकार कायदा आणणार असल्याचेही वृत्त आहे. हा कायदा नेमका कधी येणार याबाबत मात्र अजून कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
रिझर्व्ह बँकेने २०१८ मध्ये भारतातील बँकांना क्रिप्टो करंसीशी निगडित कुठलाही व्यवहार करण्यापासून बंदी घातली होती. मात्र या निर्णयाला क्रिप्टो एक्स्चेंजने २०२० मध्ये सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते आणि केसदेखील जिंकली होती. तरीही आता रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा अशी सूचना दिली गेली आहे.
एका अंदाजानुसार भारतात क्रिप्टो करंसीमध्ये व्यवहार करणारे १ कोटी इव्हेस्टर्स असून त्यांची जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक आहे. दरम्यान आयसीआयसीआय बँकेने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पेमेंट सर्व्हिस कंपन्यांना क्रिप्टो करंसीशी संबंधित सर्व व्यवहार थांबविण्याचा आदेश दिला आहे असे समजते. इंडसइंड बँकदेखील असाच निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.