तुम्ही कू वापरा अथवा नाही, कंपनीची व्हॅल्यू मात्र वाढतेय

Koo's valuation reaches USD 150 million after latest funding round

ट्विटरला पर्याय म्हणून सुरु झालेली भारतीय कंपनी कू सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्विटरवर बंदी येणार म्हणून अनेक युजर्सनी कूवर अकाउंट काढले होते. अशातच आता या कंपनीला मिळालेल्या फंडींगमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने टायगर ग्लोबलकडून सिरीज बी फंडिंगमध्ये ३० मिलियन डॉलर उभे केले आहेत. या फंडिंगमुळे कूचे व्हॅल्युएशन वाढून ते १५० मिलियन डॉलर्सवर गेले आहे.
टायगर ग्लोबलबरोबर या फंडिंग राऊंडमध्ये एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स, ड्रीम इन्क्युबेटर यांनीदेखील भाग घेतला. तसेच आयआयएफएल आणि मीराई ऍसेट्स हे दोन इन्व्हेस्टर्सदेखील या फंडिंगमध्ये सहभागी झाले होते.  महिन्यात सिलिकॉन व्हॅलीमधील इन्व्हेस्टर नवल रविकांत आणि बालाजी श्रीनिवासन यांनीसुद्धा कूमध्ये गुंतवणूक केली होती.
“येणाऱ्या काही वर्षात कूचा जगातील अग्रगण्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवणे हे कंपनीचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आक्रमक धोरणे राबवणार आहोत. आम्हाला प्रत्येक भारतीय नागरिक पाठिंबा देतो आहे. आमचे ध्येय साध्य करण्यासाठी टायगर ग्लोबल हा योग्य पार्टनर आहे.” असे कूचे संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितले.
मार्च २०२० मध्ये सुरु झालेल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच कूने ६ मिलियन युजर्सचा टप्पा पार पाडला. यातले १ मिलियन युजर्स गेल्या एका महिन्यात कूवर आले आहेत. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीसुद्धा कूवर अकाऊंट सुरु केले आहे.
कूची मालकी बंगलोरस्थित बॉम्बीनेट टेक्नॉलिजी या कंपनीकडे आहे. या कंपनीत चिनी कंपनी शूनवेई कॅपिटलचीदेखील गुंतवणूक होती. मात्र शूनवेई कॅपिटलने एप्रिल २०२१ मध्ये बॉम्बीनेट टेक्नॉलिजमधील आपला स्टेक विकला. हा स्टेक विकत घेणाऱ्यांमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ, बुकमायशोचे संस्थापक आशिष हेमराजानी, फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि झिरोधाचे संस्थापक नितीन कामत यांचा समावेश होता.

Comments are closed.