पीटर लिंच यांनी १९८८ साली लिहिलेल्या त्यांच्या ‘वन अप ऑन वॉल स्ट्रीट’ या पुस्तकात ‘मल्टीबॅगर’ या शब्दाचा वापर केला. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक रिटेलर असा शेअर शोधत असतो जो पुढे जाऊन मल्टीबॅगर ठरेल.
पण मल्टीबॅगर म्हणजे काय? तो शोधायचा कसा? तो शोधताना रिटेल इन्व्हेस्टर्सकडून कोणत्या चुका होतात? आणि कोणत्या निकषांवर आधारित तो शेअर मल्टीबॅगर ठरतो याबद्दल थोडे जाणून घेऊ.
मल्टीबॅगर म्हणजे काय?
मल्टीबॅगर म्हणजे असा शेअर जो त्यात केलेल्या गुंतवणुकीच्या कितीतरी जास्त पटीने परतावा देतो. सामान्यतः हे शेअर स्मॉल कॅप असतात. पण यातच काही शेअर्स हे फक्त गुंतवणूक करणाऱ्याच्या अपेक्षा आणि ते करत असलेली प्रचंड प्रमाणातली गुंतवणूक यामुळे मल्टीबॅगर होतात, त्या कंपनीमध्ये तेवढी क्षमता नसली तरीही.
भूतकाळात आपण पाहिले तर टायटन, जेएसडब्ल्यू स्टील अश्या अनेक कंपन्या ज्यांनी सुरुवात स्मॉलकॅप पासून केली आणि पुढे नाव कमावले. पण त्याच बरोबर अनेक शेअर्स असेही आहेत जे बुडालेसुद्धा. बाजारात त्यांना गंमतीने मल्टीबेगर म्हटले जाते. अर्थात तो प्रचलित शब्द नाही.
मल्टीबॅगर शोधताना कोणत्या चुका होतात?
१. दुसऱ्याने दिलेल्या टिप्स ला बळी पडणे. असे खूप लोक असतात जे स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ञ समजतात आणि प्रत्येकाला सल्ला देत असतात. ते स्वतः मात्र त्या शेअरमध्ये गुंतवणूक करत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास पाहून अनेक नवीन गुंतवणूकदार बळी पडतात आणि पैसे गमावून बसतात.
२. जास्त पीई रेशो असलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणे.
एखादी कंपनी आणि ती कंपनी ज्या सेक्टर मधली आहे त्या सेक्टरचा पीई रेशो यांची एकमेकांशी तुलना केली जाते. जर कंपनीचा पीई रेशो हा त्या सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा खूप अधिक असेल तर गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही १० पटीने अधिक पीई रेशो असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही त्या कंपनीच्या मागील १ वर्षातील मिळालेल्या उत्पन्नाच्या १० पट अधिक किंमत मोजत असतात.
३. गुंतवणूकीनंतर त्या शेअरच्या वाटचालीवर दुर्लक्ष करणे.
जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर आपण स्वतः त्या शेअरचा अभ्यास करणे गरजेचे असते. त्यामुळेच आपल्याला तो शेअर आपल्या अपेक्षेप्रमाणे वाटचाल करतो आहे किंवा नाही हे समजते.
४. खूप काळ शेअर धरून ठेवणे किंवा पडलेला शेअर धरून ठेवणे.
कधी कधी काही शेअर्समध्ये आपल्याला अचानक खूप हालचाल दिसते. जर तो शेअर नियमितपणे पडत असेल तर याचा अर्थ त्या कंपनीने ग्राहकांचा विश्वास गमावला आहे. जर कंपनी सतत खराब कामगिरी करत असेल तर त्या कंपनी मधून आपली गुंतवणूक काढून घेणे किंवा कमी करणे अत्यावश्यक आहे. बहुतेक वेळा अनेक गुंतवणूकदार लॉस सहन करण्यास तयार नसतात आणि तो शेअर धरून बसतात. नंतर त्याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो. यामध्ये बरेचदा रिटेल इन्व्हेस्टर्सच पैसा गमावतात असे दिसते.
५. पुरेशी माहिती नसताना धोकादायक शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे.
लवकर पैसे मिळवण्यासाठी अनेकदा गुंतवणूकदार धोकादायक शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. अश्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना स्वतः पुरेशी माहिती जाणून घेत नाहीत. ज्यामुळे हा एक प्रकारचा सट्टाच ठरतो आणि त्यात मोठे नुकसान पण होऊ शकते.
मल्टी बॅगर शेअर बद्दल काही समज आहेत ज्यातील बरेचसे समज हे खरेतर मिथक म्हणजे खोटे आहेत.
मिथक – मल्टीबॅगर शेअर आपण केवळ मार्केटमधल्या तज्ञ लोकांचे अनुसरण करूनच शोधू शकतो.
तथ्य – जर आपल्याला शेअर मार्केटबद्दल माहिती असेल तर आपणसुद्धा असे काही शेअर्स शोधू शकतो.
मिथक – आपण एखादा शेअर घेतल्यावर तो आपल्याला त्वरित परतावा देईल.
तथ्य – शेअरची किंमत बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. त्याची पूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा गुंतवणुकीचा परतावा मिळण्यासाठी वाट पहायची तयारी ठेवावी लागते.
मिथक – मल्टीबॅगरमध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकालीन असते.
तथ्य – प्रत्येक शेअरबद्दल हा नियम लागू होतोच असे नाही.
मिथक – शेअरची किंमत खूप कमी आहे.
तथ्य – प्रत्येक कंपनी ही स्वतःला लार्ज कॅपमध्ये बदलू शकते. त्यामुळे केवळ किंमत बघून काही ठरवणे चूक आहे.
मिथक – जोखीम आणि परतावा परस्परसंबंधित आहेत.
तथ्य – आधी सांगितल्याप्रमाणे, शेअरची किंमत बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे आपण असे मानू शकत नाही की जास्त जोखीम असलेल्या शेअर मध्ये जास्त परतावा मिळेल.
मिथक – हे शेअर्स कमी पीई रेशो असलेले असतात.
तथ्य – बहुतेक वेळा असे असते पण असा काही नियम नाही.
मिथक – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे.
तथ्य – अजिबात नाही. हे पूर्णपणे आपल्या अभ्यासावर अवलंबून असते.
Comments are closed.