म्हणून सध्याच्या घडीला भारतात वाढतायेत स्मार्टफोनच्या किंमती
smartphones price rise in india because of semiconductor scarcity
कोरोना व्हायरसमुळे जगात हाहाकार माजला आहे. अनेकांना या काळात आपला जीव गमवावा लागला आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेलाही चांगला बसला आहे. मार्च २०२० पासून भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाने चांगलीच हलवून टाकली आहे. भारतात सध्या अनेक कोरोना पेशंट सापडत आहेत. यामुळे देशात अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच जगातील अनेक देशांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. याचाच मोठा फटका इलेक्टॉनिक्स व मोबाईल कंपन्यांना बसला आहे. यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांवरही होत आहे.
भारतात स्मार्टफोनची एक मोठी बाजारपेठ आहे. परंतू आता याच स्मार्टफोनच्या किंमतीवर कोरोनाचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय. जगात चीप व महागड्या कांपोनन्टची सध्या मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. याचाच परिपाक मोबाईलच्या किंमतीवर होताना दिसत आहे. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर शाऊमी नोट १० हा फोन आधी १४ हजारांना मिळत होता. आता याच फोनच्या किंमतीमध्ये ५०० रुपयांची वाढ झाली आहे.
भारत हा जगात मोबाईल बनविण्यात चीन पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. परंतू यासाठी देशातील उत्पादकांना चिप्स व सेमीकंडक्टर हे परदेशातून आयात करावे लागतात. सध्या मोबाईलच्या चिप्स व सेमीकंडक्टर ची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. तैवान हा जगातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर निर्माता देश आहे. तो जगातील जवळपास ५० टक्के सेमीकंडक्टरचे उत्पादन करतो. परंतू आता याच देशातील सेमीकंडक्टर उत्पादकांवर वाढत्या मागणीमुळे मोठा दबाव येत आहे.
जुन्या मोबाईल मॉडेल्सच्या किंमतीमध्ये जवळपास ५ ते ६ टक्क्यांची वाढ झाल्याचे बोलले जात आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईटवरुनच ही खरेदी करावी लागत आहे. अगदी काही दिवसांपुर्वी वेगळ्या किंमती व आज वाढलेल्या किंमती असे चित्र या साईटवरही ग्राहकांना दिसत आहे.
मोबाईलसाठी लागणाऱ्या चिप्स व सेमीकंडक्टर ची कमतरता २०२२ सालापर्यंत जाणवू शकते, परंतू दुसऱ्या बाजूला फाईव्ह जीच्या येण्यामुळे मोबाईच्या मागणीत मात्र वाढ होणार आहे. त्यामुळे एकप्रकारचे मोबाईल संकटच देशासमोर उभे राहु शकते.
Comments are closed.